मतदारांनी ८ दिवसात विरोधकांचे नाक कापले - शंकरराव गडाख

नेवासा l DNA Live24तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली खरी लढाई तालुक्याबाहेरच्या नेत्यांबरोबरच होती. नेवासे तालुक्यात ५ - ५ लाल दिवे आपल्याविरोधात फिरत होते. पण, क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी ८ दिवसाच्या प्रचारावरच त्यांचे नाक कापले, असा सणसणीत आसूड माजी आमदार शंकरराव गडाख यांनी विरोधकांवर ओढला.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार नेवासा शहरात ठेवण्यात आला होता. यावेळी झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. या सत्कार मेळाव्यात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव मुंगसे हे होते. यावेळी प्रशांतभाऊ गडाख, विजयी उमेदवार सुनिल गडाख, सुनिताताई गडाख, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीश पालवे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी केले. प्रमुख भाषणात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली. व पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्यावर तोफ डागली. या निवडणुकीत आठच दिवसाच्या प्रचारात नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले.

शंकरराव गडाख म्हणाले कि, गडाखांच्या विरोधात नेवासे तालुक्यात रान उठवण्यात आले होते. कधी नव्हे ते घुले बंधूंनी खालच्या पातळीवर जात टीका केली. गडाखांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात ५ - ५ लाल दिवे तालुक्यात फिरत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, राधाकृष्ण विखे, शिवतारे, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सभा झाल्या. नेहमीप्रमाणे या निवडणुकीत देखील घुलेंनी आपली मते फिरवून स्वतःचेच उमेदवार पाडले. अन कुकाणा व भेंडा गट तडजोड करून निवडून आणले.

आता यापुढे आपली लढाई ज्ञानेश्वर कारखान्याने सभासदांचे अडवलेले ७० कोटी रुपये परत सभासदांना मिळेपर्यंत थांबणार नाही. तालुका विभाजनानंतर घुलेंना नेवाशाचे घेणे-देणे राहिलेले नाही. ते व त्यांचे पीए कार्यकर्त्यांना हाकलून देतात व कर्मचाऱ्यांना त्रास देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना घुले बंधूंनी गुंडाळून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुरकुटे कधीही ज्ञानेश्वर विरुद्ध बोलत नाहीत. ज्ञानेश्वराची निवडणूक बिनविरोध कशी होते, हे एक गौडबंगालच आहे. आमची मुरकुटे यांच्याशी कधी स्पर्धा नव्हतीच. कारण मुरकुटे हे जिल्ह्यातील नेत्यांच्या ताटाखालचे मांजर आहेत.

विधानसभेवेळी त्यांच्या विजयात ५ पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वाटा होता. पण ते या कार्यकर्त्यांची परतफेड करू शकले नाही. ते केवळ विखे आणि घुलेंचच ऐकतात. या निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकत देण्याऐवजी घुले व विखे यांना सोयीचे उमेदवार देऊन स्वतःचे उमेदवार वाऱ्यावर सोडले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्याविषयी बोलतांना गडाख म्हणाले कि, कारखान्याचा कारभार पाहणारे खरे अभ्यासु फक्त अभंगच आहेत. कारखान्यात त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, पण त्यांना घुले बंधुकडून अपमानास्पद वागणूक मिळते.

तालुक्यातील जनतेने कौल दिला, तसा कौल आता नेवासा नगरपंचायतीमध्ये शहरवासियांनी द्यावा. नेवासे शहरातील आम्ही केलेल्या कामाचे उद्घाटन मुरकुटे करीत आहेत. ज्ञानेश्वर मंदिराचा मूळ आराखडा ४० कोटीचा होता. नगरपंचायत निवडणुकीच्या आत ४० कोटीच्या आराखड्यास मंजुरी मिळवून दाखवा, असे आव्हान त्यांनी मुरकुटे यांना केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मिळालेल्या अपयशामुळे नगर पंचायतीची निवडणूक पुढे ढकलत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच मुरकुटे यांचा २५० कोटीचा निधी आणल्याचा दावा पोकळ असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पक्षाचे संस्थापक सतीश पालवे, माया शेंडे, बाळासाहेब नवले, एम आय पठाण आदींची भाषणे झाली. अॅड कारभारी वाखुरे यांनी सुत्रसंचालन केले.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या अध्यक्षपदी - क्रांतिकारी शेतकरी पक्षाची धुरा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांभाळावी, असा आग्रह संस्थापक पालवे यांनी धरल्यावर शंकरराव गडाखांची क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
शनिशिंगणापूर निवडीचा लवकरच खुलासा - स्वतःच्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी देतांना आमदार मुरकुटे यांनी घाणेरडा खेळ केला. शनी शिंगणापूर विश्वस्थ मंडळाची निवड हा देखील त्यातीलच एक भाग असल्याचे सांगत शिंगणापूर गौडबंगाल विषयीचा खुलासा योग्य वेळ आल्यावर करू अशा शब्दात शंकरराव गडाख यांनी मुरकुटेवर टीका केली.
घुले म्हणजे दुसरा बाजीराव - घुले बंधूंनी प्रचारामध्ये शंकरराव गडाखांना औरंगजेबाची उपमा दिली होती. याला उत्तर देतांना शंकरराव गडाखांनी घुलेंना दुसऱ्या बाजीरावाची उपमा देत ते नशेत कारखान्याचा कारभार करीत असल्याची बोचरी टीका केली.