कुख्यात गुंड प्रदीप सरोदे, रवि वाकळेसह १४ जणांची टोळी जेरबंद


राहुरी । DNA Live24 - शिर्डी परिसरातील कुख्यात गुंड प्रदीप सुनिल सरोदे, नगरच्या सावेडीतील रविंद्र नंदकुमार वाकळे यांच्यासह १४ जणांची हत्यारबंद टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे. हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ३ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतुसे, दोन कार, एक मोटारसायकल असा मुद्देमालही जप्त केला आहे. या टोळीविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सर्वांना अटक करण्यात आली. राहुरीच्या न्यायालयाने या सर्वांना ४ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी नगर मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल रॉयल चॅलेंजजवळ काही युवकांची टोळी कोणाचा तरी गेम वाजवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत राहुरी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, फौजदार लक्ष्मण भोसले, बालाजी शेंगेपल्लू, दत्ताञय उजे, सहाय्यक फौजदार दिलीप गायकवाड, पोलीस काॅन्सटेबल हर्षवर्धन बहीर, महेश भवर, लाला पटेल, अशोक गायकवाड, सुरेश भिसे, सचिन म्हस्के, राहुल कदम, निलेश मेटकर, गुलाब मोरे, लक्ष्मण बोडखे, नारायण ढाकणे आदींनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने या टोळीसोबत असलेले इतर ५ ते ६ जण पळुन गेले. तर पकडलेल्या युवकांकडून अलिशान मारूती सुझुकी कंपनीची सियाज कार (एमएच ०४ जीयु ८२२१), दुसरी विना क्रमांकाची इंडिका व्हिस्टा कार,  एक रेसर मोटारसायकल असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. शिर्डीतील कुख्यात गुंड प्रदीप सरोदे हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापैकी प्रदीप सरोदे याच्यावर यापूर्वी शिर्डी व नाशिक भागात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेल्या गावठी पिस्तुलं व जिवंत काडतुसांची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रदीप सुनिल सरोदे (रा. वाघवस्ती, शिर्डी), राहुल प्रभाकर गायकवाड, अनुराग पडोळे (भुतकरवाडी, नगर), दीपक भिमाजी सानप (श्रीरामपुर), राहुल गोरख बळे, सुरज धोंडीराम विधाते, शरद कचरे (पाईपलाईन रोड, नगर), विनोद अनिल वडागळे, अनिल मोटे ( लालटाकी, नगर), श्रीकांत प्रकाश शेंडगे (मांजरी ता. राहुरी), किरण वाकळे, रविंद्र वाकळे (सावेडी, नगर), गुट्टु अरूणसिंग (शिर्डी), रमेश करजुले (तामसवाडी, नेवासा) यांचा समावेश आहे. हे सर्वजण राहुरीत कशासाठी आले होते, त्यांच्यासोबत इतर कोण - कोण सहकारी होते, याचा शोध आता राहुरी पोलिस घेत आहेत.