लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशाला लुटले, तिघांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आरोपी - विश्वजीत कासार 
अहमदनगर । DNA Live24 - लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना वाहनात बसवून, बेदम मारहाण करुन लुटणाऱ्या तिघांच्या टोळीला न्यायालयाने एका गुन्ह्यात दोषी ठरवत प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व अार्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विश्वजित रमेश कासार (रा. वाळकी, ता. नगर), सुनिल फक्कड अाडसरे (रा. आष्टी, जि. बीड) व गोकुळ भाऊसाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. विश्वजीत कासार हा इंजिनिअर, तर इतर दोघेही सुशिक्षित आरोपी आहेत. कासार याच्याविरुद्ध युवकांची फसवणूक केल्याचेही अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत.

जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी एका रस्तालुटीच्या खटल्यात या तिघांना दोषी ठरवले. नोव्हेंबर २०१५ मध्ये सतीश माधव पवार (रा. कोपरगाव) हे पुण्याला चालले होते. नगरमधील तीन क्रमांच्या बस स्थानकावर त्यांना कासार व इतर दोघांनी तुम्हाला पुण्याला सोडतो, असे म्हणून त्यांच्या कारमधून लिफ्ट दिली. मात्र केडगावपर्यंत गेल्यानतर अचानक पवार यांच्या गळ्याला धारधार गुप्ती लावून धमकावण्यात आले. नंतर अरणगाव शिवारात नेऊन त्यांच्या एटीएमममधून पैसे काढले. रोकड व इतर मुद्देमाल कासार व त्याच्या साथीदारांनी लुटला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व सहकाऱ्यांनी तपास करुन आरोपींना अटक केली. फिर्यादीचे ८३ हजार ५०० रुपये त्यांनी हस्तगत केले. सबळ पुरावे जमा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आरोपींनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र सर्वोच्च न्यायालयात अपिल करुनही त्यांना जामीन मिळाला नाही. दोन वर्षे हा खटला अंडरट्रायल चालला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ढगे यांनी काम पाहिले.

मंगळवारी (दि. २२) या खटल्याची अंतिम सुनावणी न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. एपीआय विनोद चव्हाण, फिर्यादी सतीश पवार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सबळ पुरावे व सरकार पक्षाचे वकील ढगे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तिघांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच तिन्ही आरोपींना प्रत्येकी १५ हजार ५०० रुपयांचा आर्थिक दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. आरोपी विश्‍वजित कासार हा अट्टल गुन्हेगारी असून त्यांच्यावर जबरी चोर्‍या व फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

कोतवालीचे तत्कालीन एपीआय विनोद चव्हाण, फौजदार गजानन करेवाड, आदींच्या पथकाने वेगाने या गुन्ह्याचा तपास केला. चोवीस तासांच्या आत सराईत आरोपी विश्वजीत कासार याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात लुटलेली रोकड, गुन्ह्यात वापरलेली पोलो कार जप्त केली. सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपींना शिक्षा झाल्यामुळे सुशिक्षित गुन्हेगार व कायद्यातील पळवाटा शोधणाऱ्यांना चांगली चपराक बसेल, अशी प्रतिक्रिया एपीआय विनोद चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.