गावठी पिस्तुल विक्रेता मनोज कोथिंबिरे गजाआड


अहमदनगर । DNA Live24 - कोठला परिसरात कुख्यात गुन्हेगारांना गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या फरार गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. मनोज विकास कोथिंबिरे (वय ३३, रा. बायजाबाईचे जेऊर) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या पथकाने त्याला जेरबंद केले. पिस्तुल घेण्यासाठी आलेले दोघे मात्र पोलिसांना पाहून पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मनोज कोथिंबिरे हा गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, भरत डंगोरे, अभय कदम, एलसीबीचे मल्लिकार्जुन बनकर, मनोज गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश डहाळे, यांनी कोठला परिसरात सापळा रचला होता.

गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या मनोज कोथिंबिरेला पोलिसांनी झडप घालून पकडले. मात्र, त्याचवेळी पिस्तुल घ्यायला आलेले दोघे फरार झाले. कोथिंबिरे याच्याकडे ४५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे सापडली. फरार आरोपींची नावे इस्सार शेख उर्फ टकलू व मनोज लक्ष्मण झगरे रा. नेवासे अशी असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. कोथिंबिरेला तोफखाना पोलिसांच्या हवाली केले आहे.

मध्यंतरी श्रीरामपूर पोलिसांच्या पथकाने जेऊर बसस्थानकावर गावठी पिस्तुलासह एका युवकाला पकडले होते. त्यात मनोज कोथिंबिरे याचे नावही समोर आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे. तर यावेळी पोलिसांना पाहून पळून गेलेले दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावरही यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका लहान मुलाच्या अपहरण नाट्याच्या वेळी पकडताना फरार टकलू याने पोलिसावर गोळीबार केला होता. पोलिस आता त्यांचाही कसून शोध घेत आहेत.

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.