चिंटू आल्हाट खून खटल्यात ९ आरोपी निर्दोष मुक्त

मयत चिंटू आल्हाट

अहमदनगर । DNA Live24 - कुख्यात गुंड चिंटू उर्फ सतेज उत्तम आल्हाट (रा. नागरदेवळे, भिंगार) याच्या खून खटल्यात नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबातील तफावत व संशयाचा फायदा देत आरोपींना आल्हाटचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी हा निकाल दिला. ६ एप्रिल २०१३ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच नागरदेवळेचा उपसरपंच तथा कुख्यात गुंड चिंटूचा खून झाला होता.

चिंटू व त्याच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. समोरच्या टोळक्याने चिंटूच्या डोक्यात दगड घालून ठेचून त्याचा खून केला होता. याप्रकरणी चिंटूच्या सहकाऱ्याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी विशाल गोपाल गोहेर, अमोल दिपक छजलानी, विश्वास गोपाल गोहेर, संदीप जगदीश झांजोट, दिनेश परशराम कलुसिया, धीरज संजय मट्टू, धरम बलदेव छजलानी, मनोज विनोद चव्हाण, महेश उर्फ निखील पुरण गोहिरे, केदार संपत सोळंकी, राकेश चव्हाण उर्फ सरदार, गणेश पाठक व इतर ४ ते ६ अनोळखी जणांविरुद्ध खुनासह इतर कायदा कलमांन्वये गुन्हा नोंदवला होता.

यापैकी दिनेश कलुसिया, धरम छजलानी व केदार सोळंकी हे फरार होते. तर विशाल गोहेर व अमोल छजलानी अटक झाल्यापासून जेलमध्येच होते. काही महिन्यांपूर्वीच दिनेश कलुसियाला कोतवाली पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणात एकूण ५ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांच्यासह सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदार तपासले. चिंटू आल्हाट हा नागरदेवळे ग्रामपंचायतीचा उपसरपंचही होता. त्याच्यावरही गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल होते. या खटल्यात आरोपी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत व संशयाचा फायदा देत आरोपींची मुक्तता झाली. आरोपींतर्फे अॅड. सुहास टोणे, राहुल पवार, जय भोसले आदींनी काम पाहिले.

कोण होता चिंटू आल्हाट - चिंटू उर्फ सतेज आल्हाट नागरदेवळे (ता. नगर ) ग्रामपंचायतीचा उपसरपंच होता. त्याच्यावर खून, खंडणी मागणे, गँगवॉर, हाफ मर्डर, आर्म अॅक्ट, आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. एलसीबीने उघडकीस आणलेल्या गावठी पिस्तुल विक्री प्रकरणात नगरमध्ये दोन रॅकेट उघडकीस आलेले होते. त्यापैकी एका रॅकेटचा मुख्य सूत्रधार चिंटू आल्हाट होता. नगर तालुका व परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. नगरसह पुणे व इतर जिल्ह्यातही त्याचे गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध होते. 

भर दिवसा झाला गेम - चिंटू आल्हाटचे भिंगारमधील प्रतिस्पर्धी टोळीसोबत वाद झाले होते. वादाचे पर्यावसान गँगवॉरमध्ये झाले. त्यातून प्रतिस्पर्धी टोळी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र, तत्पूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ते जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले. ही वार्ता समजताच चिंटू आल्हाटही त्याच्या साथीदारांसह जिल्हा शासकीय रुग्णालयात आला. तेथे पुन्हा दोन टोळ्या आमनेसामने आल्या. पुन्हा गँगवॉर उफाळले, अन् रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच चिंटूची भर दिवसा हत्या झाली होती.

कोर्टात प्रचंड बंदाेबस्त - चिंटू आल्हाट खून प्रकरणाचा निकाल असल्याने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमली होती. याचा आधीच अंदाज असल्याने शुक्रवारी न्यायालयात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केलेला होता. अटकेतील आरोपींना पोलिस बंदोबस्तात कोर्टात आणले गेले. तर जामिनावर मुक्त असलेले आरोपीही हजर होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर तणाव निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी कमालीची काळजी घेतली होती. तरीही निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काही समर्थकांनी जल्लोष करण्याचा प्रयत्न केला. 

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.