नगरला अशांत करणार्‍यांना उखडून फेका : खा. रावसाहेब दानवे


नगर : शहरात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. १५ वर्षात सत्ता भोगणारे सुविधा देऊ शकले नाहीत. ते नगरकरांना पाणी देउ शकले नाही. येत्या ९ डिसेंबरला नगरकरच त्यांना पाणी पाजतील. एकेकाळी नगर शहर राज्यात प्रसिध्द होते. त्याला कुणाची  नजर लागली? शांत शहर अशांत कुणी केले? त्यांना येत्या निवडणुकीत उखडून फेका,असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रा.राम शिंदे, सरचिटणीस आ. सुजितसिंग ठाकूर, प्रदेश संघटक विजय पुराणिक, खासदार दिलीप गांधी, अ‍ॅड. अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.

शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. एकेकाळी शांत असलेले शहर अशांत झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता द्या. नव्या महापौरांचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्रांना नगर शहरात आणू, असे सांगत त्याच दिवशी नगरच्या विकासाकरिता तीनशे कोटी रुपये देऊ, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली.

माझ्या हाताला यश आहे. मी जेथे जेथे प्रचाराचा नारळ फोडतो तेथे तेथे सत्ता येतेच. नगरलाही भाजपची सत्ता येईल. भाजपचा महापौर बसल्यानंतर त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना नगरात आणून ३०० कोटी मंजूर करायला लावू, असे आश्वासन खा. दानवे यांनी दिले.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, भाजपने ६८ उमेदवार दिले. विरोधकांना तेही देता आले नाहीत. छानणीत चौघांचे अर्ज बाद झाले असले तरी न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्या कोर्टात अन् जनतेच्या कोर्टातही न्याय मिळेल. गेल्या १५ वर्षांत सत्ता भोगणार्‍यांनी काय दिवे लावले? हे सांगावे. कारगिल अन् नंतर सांगली, जळगावात जसा त्यांचा कार्यक्रम केला तसाच कार्यक्रम येथेही करू, असा दावाही त्यांनी केला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या