'मुळशी पॅटर्न'मध्ये नगरचा सागर आव्हाड चमकला !


मूळचा नगरचा असलेला सागर आव्हाड याने पत्रकारितेसोबतच चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत चंचूप्रवेश केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटात त्याने केलेल्या छोट्याशा भूमिकेचे कौतुक होत आहे.

सागर आव्हाड हा नगरमध्ये असतांना छात्र भारती विद्यार्थी संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होता. कष्टात दिवस काढून विद्यार्थी चळवळीची धुरा त्याने समर्थपणे वाहिली. त्यानंतर मुंबई, पुण्यात जात टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिणीतून गोरगरिबांच्या व्यथा तो नित्यपणे मांडत आहे.

आता चित्रपटाच्या दुनियेत त्याने प्रवेश केला असून, त्याची ही वाटचाल त्याला कुठपर्यंत घेऊन जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाविषयी थोडक्यात-

खुल्या आर्थिक धोरणानंतर झालेले आर्थिक, राजकीय, सामाजिक बदल मुळशी पॅटर्न चित्रपटाने चपखल मांडलेत. शेतीची अवस्था, औद्योगिकरण होत असताना बोकाळली गुन्हेगारी, त्यामुळे उध्वस्त झालेल्या कुटूंबाची अवस्था, शेती विकलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनातील खदखद, पैशाची अमाप हाव या सगळ्या विषयाच्या खोलात जाऊन केलेली चित्रपटाची मांडणी भावल्याशिवाय राहत नाही. ओम भूतकरचा अभिनय तर जबराट भाव खाऊन जातो. बाकी लव्ह स्टोरी, गाणी इथेही चित्रपट मागे राहात नाही.

दिग्दर्शक प्रवीण तरडे, 'आधी चित्रपट पाहा, मग प्रतिक्रिया द्या' हे सारखं-सारखं का सांगत होता चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही. ओम भूतकरने साकारलेला 'राहुल' चित्रपट संपला तरी डोळ्यासमोरुन हटत नाही. त्यांचं दिलखुलास हसणं, रांगडेपणानं वावरणं, तितक्याच पोटतिडकीने रडणं, कुटुंबाशी बोलताना कमालीचं भावनिक होणं आणि गुन्हे करताना प्रसंगी टोकाचं क्रूरपणे वागणं हे सगळं विसरता न येणारं आहे.

मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, उपेंद्र लिमये यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिलाय. दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे स्वतःला सिद्ध करतात. चित्रपटाची मांडणी, संवाद अफलातून तर आहेच पण पदोपदी विविध विषयांवर भाष्य केलं जातं. चित्रपटातील अनेक प्रसंग तर टचकन डोळ्यात पाणी आणतात. चित्रपट म्हणून एक पॅकेज असायला हवं, ही अपेक्षा मुळशी पॅटर्न शंभर टक्के नक्की पूर्ण करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या