शुक्रवारी नगरमधून मराठा संवाद यात्रेला प्रारंभ


नगर -  ‘मराठा संवाद यात्रा’ दि. १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान राज्यभर आयोजित केली आहे. नाशिक महसूल विभागीय यात्रेचा शुभारंभ नगरमधून होणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होईल, अशी माहिती इंजि. संजीव भोर पाटील यांनी दिली आहे. गुरुदत्त लॉन्स येथे नुकतीच सकल मराठा समाजाची बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी संजीव भोर म्हणाले - कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करून निर्घृण खून झाला. या घटनेनंतर सकल मराठा समाजाने एकजुटीने मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आयोजन केले. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबणे, मराठा समाजाला आरक्षण देणे आदी २० मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चानंतर सरकारने आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सरकार पुरस्कृत काही लोक आणि काही राजकारण्यांनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले.

 सरकारच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या काही स्वार्थी लोकांनी आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती नावाची संघटना व राजकीय पक्ष अशी उठाठेव करून समाजाची फसवणूक केली. आंदोलन विचलित करण्यासाठी, खीळ घालण्यासाठी मराठा पक्षाची बतावणी होत आहे. अशा गोष्टींना समाजाने भीक घालू नये. संभ्रम दूर करावा, मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करीत निर्णायक व व्यापक आंदोलनाची तयारीसाठी ‘मराठा संवाद यात्रा’ आयोजित केली आहे.

  पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्‍वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे येवला येथे यात्रा जाणार आहे. संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथे नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.

 दि. २६ नोव्हेंबर रोजी विधानमंडळावर ही यात्रा धडकणार आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला संजीव भोर, संजय अनभुले, शिवाजी चौधरी, मदन मोकाटे, सचिन चौगुले, सुभाष जंगले, नितीन पठारे, संदीप चोरमले, विजय पठारे, मयूर वांढेकर, प्रमोद भासार, मंगेश आजबे, शरद कार्ले, नंदकुमार कोतकर, विशाल म्हस्के, गणेश शिंदे, शरद दळवी, अमोल पाठक, दीपक मोरे, ज्ञानदेव दिघे, राजेंद्र कर्डिले, मच्छिंद्रनाथ म्हस्के, प्रकाश कदम, गोरख आढाव, आदी उपस्थित होते.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या