भाजपचे बाबासाहेब वाकळे नगरचे नवे महापौर, मालन ढोणे उपमहापौर

 

अहमदनगर - महापालिकेच्या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाच्या मदतीने महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र बाजी मारली आहे. नगरच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे, तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे हे दोघेही प्रत्येकी ३७ मतांनी विजयी झाले अाहेत. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून वंचित रहावे लागले.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24


महापौर निवडीच्यावेळी वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केल्याने शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला, तर जातीयवाद्यांना साथ नको म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील निवडणुकीपूर्वीच सभात्याग केला होता. महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कालावधीत वाकळे यांच्या रुपात भाजपला प्रथमच महापौरपद मिळाले आहे.

यावेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्र येत यशस्वी खेळी केली. भाजपच्या वाकळे यांना ३७ मते मिळाली. गोंधळ होऊपर्यंत शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना पडलेली मते ८ भरली. त्यामुळे ३७ विरूद्ध ८ मतांनी वाकळे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. नंतर राष्ट्रवादी, भाजप, बसपा अशी ३७ मते ढोणे यांना मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.


बाबासाहेब वाकळे आणि मालन ढोणे यांच्या रुपाने भाजपला नगरच्या महापालिकेत कमळ फुलवण्याची यशस्वी संधी मिळाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळीच शहरात दाखल झालेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीसोबत युती केल्याचे सांगितले आहे. याचा राज्य पातळीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचे अँड्रॉइड app डाउनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnalive247.DNALive24

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या