मिठाईचे बॉक्स वाटून खासदार होता येत नाही: घनःशाम शेलारांचा सुजय विखेंना टोलानगर : 

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दिवाळीच्या वेळेस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायट्यांच्या सदस्यांना मिठाईचे बॉक्स सुजय विखेंनी वाटले. मिठाई वाटून निवडणूक लढविण्याची नवी पद्धत त्यांनी सुरु केली. मात्र दक्षिणेतील जनता ही सुज्ञ असून, दक्षिणेत घराणेशाही चालू देणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आर्थिक प्रलोभनाला जनता बळी पडणार नसून, मिठाईचे बॉक्स वाटून कुणाला खासदार होता येणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनःशाम शेलार यांनी सुजय विखेंना टोला लगावला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत शेलार यांनी पत्रकार परिषदेत डॉ. सुजय विखे व खा. दिलीप गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळेस शिवसेना स्वबळावर लढणार असा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून मला निवडणूक लढवण्याचे संकेत सुद्धा मिळालेले असून, मी ही निवडणूक लढविणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन त्यांनी निवडणुकीच्या उमेदवारी बाबत स्वतः घोषणा करु लागले आहेत. मीच लोकसभेचा उमेदवार आहे. मीच निवडणूक लढणार. निवडणूक हरलो तर राजकारण करणार नाही असे वक्तव्य करून गावोगाव सध्या टाहो फोडू लागले आहेत. मी निवडून आलो काय किंवा हरलो काय, पण राजकारण सोडणार नाही.

विखे वल्गना करत आहेत की, पक्ष म्हणजे गुंडांच्या टोळ्या आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्यास ऐनवेळी कुठल्याही पक्षात जाईल. परंतु, मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने ऐनवेळी मला माघार घेण्यास सांगितले तर मी माघारही घेईल. दक्षिणेत खासदार कोण होईल हे जनता ठरवेल. उत्तरेतील एखादे घराणे नाही. मी स्वाभिमानी आहे. त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक मतदार मला स्वीकारतील.

नगर दक्षिण मतदारसंघांमध्ये पाण्याचा प्रश्‍न, साकळाई सिंचन योजनेचा प्रश्‍न, तसेच एमआयडीसी, उद्योगांचे प्रश्‍न अद्यापही सुटू शकलेले नाहीत. रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे अशी अपेक्षा असताना  खासदार दिलीप गांधी यांनी याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा विकास खुंटला असल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला. सध्याच्या खासदारांचा नावलौकिक असा काही भाग राहिलेला नाही. त्यांच्या त्याब्यात आलेली नावलौकिक असलेली बँक त्यांनी संपवली हाच काय तो त्यांचा नावलौकिक. ते स्पर्धेत राहतील की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. 1999 साली मला लोकसभेची उमेदवारी भाजपाकडून जाहीर झालेली होती. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांमुळे ती उमेदवारी मला नाकारण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या