साई ज्योतीचा ब्रँड नेम राज्यात पोहोचवा! ना. शालिनी विखे


नगर : 
साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा प्रदर्शनाला यंदाही उदंड असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दशकपूर्तीचे हे वर्ष अधिक संस्मरणीय ठरले. संघटीत झालेल्या महिला कोट्यवधींची उलाढाल करू शकतात हे प्रदर्शनातून पहायला मिळाले. आता केवळ जिल्ह्यातच राहून चालणार नाही, साईज्योतीचा ब्रॅण्ड राज्यात पोहचविण्याची तयारी करायला हवी. आणखी बचत गट निर्माण करून जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेच्यावतीने गुलमोहोर रोडवरील तांबटकर मळा मैदानावर आयोजित साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा प्रदर्शनाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी अध्यक्षा विखे बोलत होत्या. कार्यक्रमास संगमनेर पंचायत समितीच्या सभापती निषाताई कोकणे, प्रकल्प संचालक परिक्षित यादव, रमेश कासार, किरण साळवे, बाबासाहेब तागडे, वृषाली साळवे, स्मिता बिचके, विजय चौसाळकर, कल्पना शिंदे, प्रविण वाळके, मंजुषा धीवर, रजनी जाधव आदी उपस्थित होते.
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आयोजित या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी, महिला अधिकारी ,कर्मचारी व महिला बचत गटांच्या सदस्यांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला बचत गटांना प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. समारोपाच्या कार्यक्रमाकडे उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.
विखे म्हणाल्या की, मकरसंक्रांतीच्या सणावेळी वाण देण्याची आपली परंपरा आहे. यानिमित्त सर्वांनी बचत गटांच्या चळवळीच्या विचारांचे वाण गावोगावी पोहचविण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक बचत गटांनी आणखी बचत गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ही चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिक्षित यादव म्हणाले की, पाच दिवसांच्या या विक्री प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, उत्पादने सर्वांनाच आवडली. या प्रतिसादामुळे बचत गटांनाही आणखी प्रेरणा, प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळाले असेल. यावर्षी सर्व बचत गटांच्या उत्पादनांची एकत्रित मिळून सुमारे दीड कोटींची विक्री झाली. भविष्यातही या प्रदर्शनातून अधिकाधिक महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या