शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणार : महापौर बाबासाहेब वाकळेनगर :
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानुसारच नगर महापालिकेत काम करणार आहे. शहर विकासाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड न करता रखडलेेले प्रकल्प, योजना मार्गी लावण्यासाठी तसेच आणखी नवीन प्रकल्प शहरात आणण्यासाठी, शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सावेडीतील रखडलेले नाट्यगृहाचे काम मार्गी लावून येत्या वर्षभरात नाट्यगृहाचे उद्घाटन करणार असल्याचेही ते म्हणाले.
नूतन महापौर वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पदभार स्विकारला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी नगरसेवक किशोर डागवाले, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा आदींसह भारतीय जनता पक्ष व बसपाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले की, शहरासाठी १२ तासांपेक्षा अधिक वेळ देवून रखडलेली कामे मार्गी लावणार आहे. शहरात चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच सीना नदी सुशोभिकरणासाठी येत्या अडीच वर्षात ठोस पावले उचलली जातील. शासनाकडून निधी मिळविण्यासाठी कामे प्रस्तावित करुन अंदाजपत्रके तयार करणे, प्रस्ताव तयार करणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. महापालिकेला आयएएस दर्जाचा पूर्णवेळ आयुक्त मिळावा, इतर अधिकार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरली जावीत, यासाठी प्रयत्न करणार आहे. मंत्री गिरिष महाजन हे महापौर निवडणुकीच्यावेळी नगरमध्ये उपस्थित होते. आमची महापौर-उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासासाठी ताबडतोब याच महिन्यात 100 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यासाठी प्रस्ताव व विकास कामांचे नियोजन तातडीने अधिकार्‍यांमार्फत करणार आहोत.
उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या की, या आधी कधीही भाजपाचा महापौर झाला नाही. भाजपाला उपमहापौरपद तीन वेळेला मिळाले. मात्र प्रत्येकवेळी सापत्न वागणूक मिळाली. सर्वपक्षांच्या मदतीने आम्हाला हे पद मिळाले आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या