अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेला भाजप देणार महापौरपद?


नगर :
देशपातळीवर शिवसेना व भाजपात लोकसभेसाठी युतीची घोषणा नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली. विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टी जागांवर सहमत झाले आहे. युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत होत असतांना नगर महापालिकेत राष्ट्रवादीसोबत भाजप गेला असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते लोकसभेला भाजपला झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला पुन्हा महापौर पद देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे खरंच सत्ताबदल होणार का? याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना व भाजपची युती जाहीर झाली असली तरी ‘युती’चे वारे सध्या वरीष्ठ पातळीवरच वाहत आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे काही आमदार, खासदारांनी स्वागत केले असले, तरी नगर शहरासह राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील मनभेद निवणुकीतही कायम राहण्याचीच चिन्हे आहेत. नगर शहरात दोन्ही पक्षांमधील स्थानिक नेत्यांची मने जुळविण्याचे आव्हान नेत्यांसमोर असल्याचे चित्र आहे.

नगर महापालिकेत मागील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर असतांना उपमहापौर पद भाजपाकडे होते. शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपाने महापौर पदासाठी उमेदवार देऊन शिवसेनेची कोंडी केली होती. अखेरच्या क्षणी राज्य पातळीवरुन हस्तक्षेप झाल्यानंतर युती झाली. मात्र, अडीच वर्षात भाजप व शिवसेनेच्या परस्पर कुघोड्या सुरुच राहिल्या. आता तर भाजपाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी उघडपणे आघाडी करुन महापौर पद मिळविले आहे. मनपात सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना उपनेते अनिल राठोड व भाजप शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांच्यातील वाद यानंतर विकोपाला गेले आहेत. त्यातूनच शिवसेनेने पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना पत्र पाठवून लोकसभा निवडणुकीत खा. दिलीप गांधी यांचे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वरीष्ठ नेत्यांपासून ते शिवसेनेच्या खालच्या फळीतील कार्यकर्त्यांपर्यंत खा.गांधी यांच्या विरोधातच काम करायचे, असा सूर निघाला आहे. भाजपाने उमेदवार बसलला तरच शिवसैनिक काम करतील, अन्यथा दक्षिण लोकसभेची जागाच शिवसेनेला घ्यावी, अशी मागणीही पक्षाकडे करण्यात आली आहे. राज्यात युतीची घोषणा झाल्यानंतर तर एका पदाधिकार्‍याने उध्दव ठाकरेंनी घेतलेला ‘युती’चा निर्णय चुकीचाच असल्याचे म्हटल्याचे वृत्तही झळकले आहे. यातून वरीष्ठ पातळीवर मनोमिलन झाले असले, तरी स्थानिक पातळीवर मनभेद कायम असल्याचे व निवडणुकीतही कायमच राहतील, असे चित्र आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेची मनधरणी करायची कशी हा प्रश्न भाजपसमोर असून, महापौरपद देऊन शिवसेनेला शांत करण्याचा पर्याय भाजपसमोर खुला आहे. सत्तास्थापनेवेळी भाजपला साथ दिलेल्या राष्ट्रवादीने आता भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली असून, आगामी निवडणुकीला सामोरे कसे जायचे असा प्रश्न भाजपच्या पक्ष नेतृत्वासमोर उभा आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजप महापौरपद देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या