स्वबळावर लोकसभेच्या ५ जागा लढविणार : आ. नितेश राणे


सोलापूर : 

स्वाभिमानी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर राज्यात ५ जागा लढविणार आहे. जिथे शिवसेना तिथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा विरोधच राहणार असल्याने भविष्यातही शिवसेना युतीत असेल तर युतीला पाठिंबा नाही, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आ. नितेश राणे यांनी सोलापुरात लगावला.आमचा पहिला आणि शेवटचा शत्रू शिवसेना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. राणे यांनी डाक बंगला येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर, सुनील खटके, कामगार नेते जयवंत कोकाटे, महेश देवकर, भंवर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेचा शिवसेनेवर विश्‍वास राहिलेला नाही.पाच वर्षे सत्तेत असताना गप्प राहिलेले उध्दव ठाकरे यांना सत्ता जाताना धनगर समाजाच्या आरक्षणाची आठवण झाली आहे. आता आरक्षण देण्याचे आश्‍वासन देऊन ते फोटोसेशन करीत आहेत. शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सोशल मीडियावर शिवसेनेवर टीका होत आहे. सोशल मीडिया या निवडणुकीत 90 टक्के प्रभाव पाडणार असल्याने शिवसेनेचा फटका भाजपलाही बसणार आहे. आमचा पहिला आणि शेवटच्या क्रमाकांचा शत्रू शिवसेनाच असल्याचेही आ. राणे म्हणाले.

पक्षाच्या नूतन पदाधिकार्‍यांची घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा खा. नारायण राणे यांनी 15फेब्रुवारीला केली असून सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जगदीश बाबर यांची नियुक्ती केली आहे. लवकरच इतर पदाधिकारी जाहीर करून सोलापुरात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. आमचा पक्ष लोकसभेच्या पाच जागा स्वबळावर लढणार असून विधानसभेतही ताकदीने मैदानात उतरणार आहे. आता सर्वच पक्ष आमच्यासाठी विरोधक आहेत. या सरकारने मराठा, धनगर, मुस्लिम समाजाची फसवणूक केली असल्याने 2019 च्या निवडणुकीत या सरकारला मतदार धडा शिकवतील.

सोलापुरात लोकसभा नाही, पण विधानसभेला मात्र, आमचा पक्ष निश्‍चित मैदानात असणार आहे. भाजप-सेना आणि काँगे्रस-राष्ट्रवादीतील अनेक नाराज आमच्या संपर्कात आहेत. सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण म्हणजे हे सरकार मार्केटिंगवरच भर देणारे असल्याचाही टोला आ. राणे यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या