विखे साहेब, सुजय दादांना खासदार करायचंय, भाजपात चला; कार्यकर्त्यांचा आग्रहनगर :
नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी सोडत नसल्याने डॉ. सुजय विखे यांनी ही निवडणूक भाजपाकडून लढवावी, असा आग्रह काल राहाता येथील बैठकीत कार्यकर्त्यांनी धरल्याचे पहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी यावेळी कॉंग्रेस नेत्यांच्या वागणुकीवर जोरदार टीका केली. 'विखे साहेब, सुजय दादांना खासदार करायचय, आता तुम्ही भाजपात चला' असे म्हणत कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे विखे कुटुंबीय काय निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देताना पक्षाने न्याय दिला नाही, तर आपण कार्यकर्त्यांबरोबर राहू, असा सूचक इशारा दिल्याने जिल्ह्यात राजकीय भुकंपाचे संकेत मिळाले आहेत.


शिर्डी विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे हे होते. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र भाजपमध्ये जायचे की अपक्ष लढायचे ? याबाबत कार्यकर्त्यांनी आपली मतं व्यक्त केली.

यावेळी अ‍ॅड. रघुनाथ बोठे, कैलास कोते, अभय शेळके, डॉ.भास्कर खर्डे, शांतीनाथ आहेर, राजेंद्र कुंकुलोळ, रावसाहेब साबळे आदींनी विचार मांडले.बहुतांशी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला. तसेच शेजारून आडकाठी होत असेल आणि काँग्रेस पक्षाकडून सन्मान मिळत नसेल, तर आपली ताकद दाखवून द्या, अशी भूमिका मांडली. तसेच राष्ट्रवादीला भविष्यकाळ नाही मात्र भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून त्यात मोठी ताकत मिळू शकते. पक्षाची हक्काची मतं असल्याने निवडणूक सहज जिंकता येईल. देशातील एकूण परिस्थिती बघता भाजपला पुन्हा सत्ता मिळू शकते, असे वातावरण दिसत असल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अनेक वक्त्यांनी केली. याशिवाय राहुल गांधींचे नेतृत्व देश चालवण्यास सक्षम नसल्याचे मतंही याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले. 

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर सांगितले की, निष्ठावान कार्यकर्ते ही आपली खरी ताकद आहे. पद्मभूषण खा.विखेंनी अनेकदा महत्वाचे राजकीय निर्णय घेताना कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतले. भाजपात जाण्याचा अथवा नगरमधून अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच घेतला होता. राष्ट्रवादीने जागा सोडावी म्हणून आपण भरपूर प्रयत्न केले. नगरमधून डॉ. सुजय विखे निवडणूक लढणार हा निर्णय सर्वांच्या भावना ऐकल्यानंतर आपण या बैठकीत घेत आहोत.अपक्ष लढायचे की भाजपमध्ये जायचे याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक कार्यकर्त्याने दक्षिण नगरमध्ये जाऊन नातेवाईक, मित्रपरिवार आणि संबंधित लोकांकडे  जाऊन लोकभावना जाणून घ्यायची आहे. दि. 1 मार्चपासून सर्वांनी ही जबाबदारी घेऊन अभिप्राय द्यावा. त्यानंतर योग्य निर्णय आपण करू, अशा शब्दात ना. विखे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. या बैठकीला दीड हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनीही काही काळ या बैठकीस हजेरी लावली. डॉ. सुजय विखे मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या