खा. दिलीप गांधींवर नगर दक्षिणेत शिवसैनिकांची नाराजी का?DNALive24: अहमदनगर
लोकसभा निवडणूक जवळ आली असतांना राज्यात लोकसभेसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यात शिवसेना २३ व भाजप २५ जागांवर निवडणूक लढवू शकतात. एकीकडे राज्यात युती होत असतांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपचे खा. दिलीप गांधी यांना तिकीट अंतिम मानले जात आहे. परंतु, गांधी यांना तिकीट दिल्यास त्यांचे काम आम्ही करणार नाही. दक्षिण नगर जिल्ह्याची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. खा. गांधी यांच्यावर असलेला हा शिवसैनिकांचा रोष नेमका कशामुळे हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

खा. दिलीप गांधी भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा या मतदारसंघातून खासदार आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांचे पारडे जड वाटत असतांना नगरला मोदींच्या झालेल्या सभेने वातावरण बदलले. गांधी पुन्हा खासदार झाले. युती असल्याने शिवसैनिकांनीही त्यांना मदत केलीच. निवडणूक झाल्यानंतर मात्र खा. गांधी यांनी शिवसैनिकांना जणू वाळीतच टाकले. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेत शिवसेनेच्या विरोधात भाजपने उमेदवार दिल्याने २५ वर्षे आ. राहिलेल्या अनिल राठोड यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याचाही राग शिवसैनिकांच्या मनात आहेच.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

महापालिकेत सत्तेत एकत्र असतांना शिवसेनेला अडचणीत आणायची संधी भाजपने सोडली नाही. नुकत्याच झालेल्या नगरच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला बाजूला सारत भाजपने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. नगर तालुक्यातही भाजपचे आ. शिवाजी कर्डीले यांच्या शिवसेनेतील विरोधकांना भाजपकडून दुय्यम वागणूक मिळाली. केडगावात शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर आरोपी असलेल्या कोतकर समर्थकांना भाजपात घेऊन शिवसेनेच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम भाजपने केले. त्यामुळेच की काय भाजप खा. दिलीप गांधी यांना शिवसेना विरोध करत असल्याचे चित्र आहे.

(ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा marathi.dnalive24.com वर)

प्रत्यक्षात निवडणूक अद्याप जाहीर झाली नसल्याने त्यानंतर शिवसैनिक खा. गांधी यांचे काम करणार की विरोधकांना मदत करणार? हे पाहणे महत्वाचे आहे. नगर दक्षिण मतदार संघात काही ठराविक भाग वगळता खा. गांधी यांनी विकासकामे केली नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेने गांधींना मदत केली असल्याने जनतेतून शिवसैनिकांनाही विचारणा होत आहे. त्यामुळे जनतेची नाराजीच एकप्रकारे शिवसैनिकांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या