११ प्रकारची ओळखपत्रे मतदानासाठी ग्राह्य : जिल्हाधिकारी



नगर :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ साठी मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी इतर ११ पर्यायी दस्तावेज ग्राहय धरण्यात येणार असल्याचे  भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे, नागरिकांनी मतदान ओळखपत्र नसेल तर ही कागदपत्रे मतदानावेळी  सोबत ठेवावीत, असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जे मतदार मतदानावेळी मतदार छायाचित्र सादर करु शकणार नाहीत, त्यांनी खालीलपैकी एक छायाचित्रांसह असलेले ओळखपत्र सादर करुन त्यांची ओळख पटवून देणे आवश्यक ठरणार आहे.

यांत पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या ह्यांनी कर्मचार्‍यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, बॅंक/पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी  (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधारकार्ड.

छायाचित्रांसह मतदार ओळखपत्रांसंदर्भातही आयोगाने सूचना दिल्या आहेत. जर छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असेल तर त्यातील टंकलेखन व शब्दलेखन चुका आदी किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. जर एखाद्या मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदान केंद्राच्या संबंधित मतदार यादीत असेल आणि तो अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकार्‍याने जारी केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करीत असेल तर असे मतदार ओळखपत्र देखील मतदाराच्या ओळख पटविण्यासाठी स्वीकारण्यात यावे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्र  आदी मुळे मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास मतदारास  आयोगाने ठरवून दिलेल्या इतर पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख दस्तावेज सादर करणे आवश्यक राहील.

जे परदेशी मतदार त्यांच्या पासपोर्टमधील तपशीलांवर आधारित लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम २० ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणीकृत आहेत, त्यांना मतदान केंद्रात केवळ त्यांच्या मूळ पारपत्राच्या आधारेच ओळखले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या