२५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरु; शाळांची होणार नोंदणीनगर : 

शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठीव विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थ सहाय्यित शाळांमध्ये किमान २५ टक्के जागांसाठी मोफत प्रवेश देण्यात येतात. त्यानुसार या मोफत प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेस सुरुवात झाली असून, १४ मार्च रोजी मोफत प्रवेशाची पहिली सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याअंतर्गत प्रवेश झालेल्या ब्बलकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनातर्फे करण्यात येते. शाळेपासून १ ते ३ किमी अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य दिले जाते. पहिल्या फेरीत १ किमी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार असून, त्यानंतर त्यापेक्षा दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येणार आहे.

प्रवेशास पात्र असलेल्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची नोंदणी व त्याची पडताळणी शिक्षण विभागाकडून ८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील शाळानिहाय उपलब्ध असलेल्या जागांची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर २५ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. अर्जांमधून लॉटरी पद्धतीने १४ ते १५ मार्चला प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली जाईल.

२०१४ सालपर्यंत ऑफलाईन असलेली ही प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये अहमदनगर महानगरपालिका व नगर तालुका अशा दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. २०१६-१७ मध्ये संपूर्ण जिल्ह्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. मात्र त्यावेळी ही प्रक्रिया राबविताना उशीर झाल्याने बऱ्याच पालकांना प्रवेश घेता आला नाही. मागील वर्षीही अनेकांना ऑनलाईन प्रक्रिया लक्षात न आल्याने प्रवेशापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे अशा पालकांना यावर्षी पुन्हा संधी मिळणार आहे.

प्रवेशासाठी आता संकेतस्थळ सुरु होण्याची वाट पालक पाहत आहेत. यापूर्वी अनेकदा २५ टक्के राखीव असलेले प्रवेश विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याच्या तक्रारी होत्या.  त्यासाठीही समिती स्थापन होणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या