विखेंना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरातांची खेळी; काँग्रेसची उद्या बैठकनगर - 
मुलगा भाजपात आणि वडील काँग्रेसमध्ये अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांना अडचणीत आणण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी खेळी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेसच्या जिल्हा कमिटीची बैठक उद्या आयोजित करण्यात आली असून, इतक्या दिवस अज्ञातवासात असलेल्या श्रीगोंद्यातील राजेंद्र नागवडे यांना थोरातांनी पुढे केले आहे. त्यामुळे दक्षिण लोकसभा मतदारसंघात थोरातांचा विरोध सुजय विखेंना चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची विस्तारित जिल्हा कार्यकारणी बैठक आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, केंद्रीय निरीक्षक व जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत रविवार, दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 1 वाजता अहमदनगर येथे होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या 19 ब्लॉक कमिट्या, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, विद्यार्थी काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस आणि इतर सर्व संलग्नित फ्रंटल यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक व नूतन जिल्हाध्यक्ष मा. श्री. करण ससाणे आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम अहमदनगर येथिल तुषार गार्डन येथे होणार आहे.

यावेळी आयोजित बैठकीत शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने जबाबदाऱ्यांचे वाटप, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नेत्यांच्या सभा व त्यांचे नियोजन, प्रत्येक तालुक्यातील कॉंग्रेसचे सर्व फ्रंट कार्यान्वित करणे आदी विषयांवर तपशिलवार चर्चा होणार आहे.

कॉंग्रेस पक्षाची भूमिका, ध्येय धोरणे आणि जबाबदारींची विभागणी, मतदारापर्यंत घेउन जाण्याचे मुद्दे आदी विषयांवर केंद्रीय निरीक्षक मार्गदर्शन करणार आहे. देशात कॉंग्रेस पक्षाला अत्यंत सकारात्मक वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जिल्ह्यातील दोनही जागा जिंकण्याचा निश्चय पक्षाने केला असून त्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याकडे केंद्रीय नेतृत्वाचे विशेष लक्ष आहे, असेही नागवडे म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी करण ससाने यांची नियुक्ती केली. काँग्रेस पक्षाला अत्यंत तरुण चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून लाभला आहे, शिवाय आगामी लोकसभा आणि आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने करण ससाने यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक तालुक्‍यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी आणि राहुल गांधी यांचा विचार अखेरच्या माणसापर्यंत पोहोचवा यासाठी सदर बैठक अत्यंत महत्वपूर्ण आहे.

तरी सदर बैठकीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या