डॉ. सुजय विखे यांचा अखेर भाजपात प्रवेशमुंबई : 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज ( मंगळवारी ) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

प्रवेशासाठी आज सकाळीच सुजय विखे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहे. पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डीलेही शिवनेरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवाय अहमदनगरमधील सर्व स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सुजय यांच्या स्वागतासाठी सज्ज रहा, असा निरोप दिला होता.

सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट आणि शिर्डी संस्थानचं उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

मात्र अहमदनगर लोकसभेचं तिकीट सुजय विखेंना दिल्यास विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे दिलीप गांधी समर्थकांनी सुजय विखेंच्या नावाला विरोध केला आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सुजय विखे यांना उमेदवारी देऊ, अशी मागणी करत घोषणाबाजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालं.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. शरद पवार सुजय विखे यांचं महाआघाडीत योगदान काय? , असा सवाल उपस्थित केला होता. शिवाय जागेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र शेवटपर्यंत जागेचा तिढा न सुटल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चावरुन राधाकृष्ण पाटील यांना हायकमांडचं बोलावणं आलं होत. यावेळी त्यांनी अहमदनगरच्या जागावाटपासंबंधी तोडगा निघाला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली. अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भिक इशारा त्यांनी दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या