उद्योगवाढीसाठी पूरक वातावरणनिर्मिती हवी : माजीमंत्री दिलीप वळसे यांचे प्रतिपादननगर :
शहरानजिकच्या रांजणगाव, चाकण, सुपा औद्योगिक वसाहतीच्या तुलनेत नगरची औद्योगिक वसाहत झपाट्याने वाढत नाही, अशा तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहेत. कायदा-सुव्यवस्था आणि अन्य समस्या यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरच्या औद्योगिक वसाहतीचा विस्तार व्हावा, या हेतुने उद्योगवाढीसाठी पूरक वातावरणनिर्मिती करावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च तंत्रशिक्षण, ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिलीप वळसे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील  औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या जिमखाना सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी संजय बंदिष्टी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शेतकरीपुत्रांच्या या उद्योग वसाहतीचा विस्तार व्हावा आणि नवीन उद्योग या शहरात सुरु व्हायला हवे आहेत, अशी सामान्य नगरकरांसह आमचीही इच्छा आहे. मात्र यासाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र यासाठी जमिन संपादन करतांना संबंधित  शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक, पुणे महानगरपालिकेचे माजी महपौर अंकुश काकडे म्हणाले, नगरच्या उद्योगवाढीसाठी येथील नेतृत्व प्रगल्भ असावे लागते. पुणे आणि नगरच्या उद्योग वसाहतीमध्ये हा फरक आहे. येथील एमआयडीसीच्या विस्तारासाठी आणि उद्योजकांच्या समस्येवर उपाययोजनेसाठी सांघिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. सर्वांच्या संघटित प्रयत्नांच्या जोरावर नगरच्या एमआयडीसी विकास आणि विस्तार शक्य आहे.

अशोक सोनवणे म्हणाले, राज्यात सर्वात जुनी असलेली ही उद्योग वसाहत असून या भागांत वीजदराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्याचबरोबर येथे स्थानिक समस्या असून युनियनच्या राजकारणामुळे उद्योजकांना विविध प्रकारच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी ज्या ज्यावेळी आ. संग्राम जगताप यांना संपर्क साधण्यात आला, त्या प्रत्येक वेळी आ. जगताप यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या पुढाकाराने येथील प्रश्नांची तीव्रता काही अंशी कमी झाली. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून केंद सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी येथील उद्योजक आ. जगताप यांच्या सदैव पाठीशी राहिल.

दरम्यान, यावेळी एमआयडीसीतील उद्योजकांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला. यावेळी दिलीप अकोलकर, प्रविण बजाज, अरुण कुलकर्णी, दौलत शिंदे, सुनिल कानवडे आदींसह शेकडो उद्योजक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या