नगर शहरासाठी धरणात मुबलक पाणी; उन्हाळ्यात कपात नाही!

1%2B%25282%2529


नगर : प्रतिनिधी
शहराच्या पाणी प्रश्‍नाबाबत यंदा ऐन उन्हाळ्यात नगरकरांना दिलासा मिळणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात नगरसाठी राखीव असलेला पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट टळणार आहे.


सर्वत्र उन्हाचा पारा वाढल्याने जलस्रोतांवर परिणाम होत आहेत. राज्यात टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणार्‍या गावांची संख्या ११ हजारांवर पोहचली आहे. भूजल पातळी खाली गेल्याने तसेच जलस्रोत कोरडे पडू लागल्याने विहिरी आणि बोरवेलमधूनही पाणी मिळणे मुश्कील होत असल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अशास्थितीतही मुळा धरणात नगर शहरासाठी राखीव असलेला पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. महापालिकेच्या पाणी योजनेवरील उपसा पंपांना पाणी उपश्यासाठी १९५२ फुटांची पातळी राखणे आवश्यक आहे. सध्या १९५९.५० फूटांपर्यंतची पातळी आहे. तसेच धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव असून सध्या आवर्तनेही बंद करण्यात आली आहेत. आगामी काळात केवळ पिण्यासाठीच पाणी दिले जाणार असल्याने पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचा अंदाज मनपा अधिकार्‍यांकडून व्यक्‍त केला जात आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नगरकरांना पाणी टंचाईच्या संकटापासून मुक्‍ती मिळण्याची चिन्हे असून, यंदा पाणीकपात होण्याची शक्यताही कमीच असल्याचे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या