मुख्यमंत्र्यांची तोफ नगरमध्ये गरजनार; सुजय विखेंसाठी मंगळवारी सभा



नगर : 
महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवघ्या चार दिवसांत पुन्हा नगरमध्ये येणार आहेत. तालुक्यातील वाळकी येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन १६ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या प्रचार नियोजनाची बैठक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस दिलीपराव भालसिंग, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, दिपक कार्ले, योगीराज गाडेकर, रविंद्र कडुस, रविंद्र भापकर, शरदराव बोठे, रमाकांत बोठे, प्रविण कोकाटे, मनोज कोकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, वाळकी येथे होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण तालुक्याचे भवितव्य अवलंबून असलेल्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्न गेली अनेक दिवस प्रलंबित आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेवून या योजनेतील अडथळे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी साकळाई पाणी योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. मात्र, समोरचे उमेदवार साकळाई योजना पूर्णपणे मार्गी लागली असून, यावर आता फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी आहे, असे सांगत आहेत. नेमकी वस्तुस्थिती महायुतीच्या कार्यकर्त्यांसह या तालुक्यातील सामान्य माणसाला कळली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनीच साकळाई योजनेबाबत तालुक्यात येवून भाष्य करावे असा आग्रह मी केला होता. मुख्यमंत्र्यांनी सभेस येण्याचे मान्य केल्यामुळे साकळाई योजनेचा सोक्षमोक्ष होईल, असा विश्वास डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले की, निवडणुकीच्या निमित्ताने या भागाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची मोठी संधी आहे. श्रीगोंदा तालुक्याची औद्योगिक वसाहत असेल किंवा या भागाच्या प्रलंबित पाणी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सभेची जोरदार तयारी महायुतीच्या वतीने करण्यात येत असून, यासाठी महायुतीचे कार्यकर्ते सक्रियतेने कार्यरत झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्यात आता डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर मुख्यमंत्र्यांची होणारी सभा ही महायुतीच्या प्रचारासाठी निर्णायक ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या