मतदान यंत्रे ‘स्ट्रॉंगरुम’मध्ये; सीआयएसएफ जवानांचा पहारा


नगर : प्रतिनिधीलोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ‘स्ट्रॉंगरुम’भोवती पोलिसांसह सीआयएसएफच्या जवानांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य निरीक्षक युवराज नरसिंहन आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी (दि.२४) मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या महामंडळाच्या परिसरास भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. या परिसरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवावी. परिसरातील सीसीटीव्ही कायमस्वरुपी सुरु रहावेत, असे सांगत काम सुरु असलेल्या प्रत्येक ठिकाणी कामासाठी येणार्‍या मजुरांची नोंद ठेवावी व ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर आदींसह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिर्डी येथील मतदान पार पडल्यानंतर तेथील मतदान यंत्रेही याच वखार महामंडळात आणण्यात येणार आहेत. याच ठिकाणी दोन्ही मतदार संघातील मतदानाची मोजणी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या