बोल्हेगाव रस्त्याच्या कामावरुन शिवसेना आक्रमक; शहर अभियंत्यांवर फेकला बूट

IMG-20190426-WA0055वेब न्यूज
बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराकडून अद्याप काम सुरु होत नसल्याने व रस्त्याची खोदाई करुन अर्धवट काम ठेवल्यामुळे आक्रमक शिवसेना नगरसेवकांनी उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी काम रखडले असतांना प्रशासन ठेकेदारावर कारवाई करत नसल्यामुळे आंदोलकांनी आयुक्तांना जाब विचारला. दरम्यानच्या काळात शहर अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे एका आंदोलकाने पायातील बूट काढून त्यांच्या दिशेने भिरकावला. या घटनेमुळे मनपात खळबळ उडाली आहे.


शिवसेना नगरसेवकांनी यापूर्वीही अनेकवेळा बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत आंदोलने केली आहेत. मनपा अधिकार्‍यांनी आठवडाभरात काम सुरू करण्याचे आश्‍वासन मागील आंदोलनावेळी दिले होते. त्यानंतर अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत काम सोडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ठेकेदार काम करत नसतांना मनपा अधिकारी कारवाई का करत नाहीत? असा सवाल यावेळी अशोक बडे, दत्तात्रय सप्रे, निलेश भाकरे, अक्षय कातोरे, मदन आढावा यांनी उपस्थित केला. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे आंदोलकांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्याशी संपर्क साधला. राठोड यांनी तात्काळ मनपात येवून आयुक्तांना जाब विचारला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावातून हे काम सुरू होत नसल्याचा आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी केला. अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नसल्याने आक्रमक कार्यकर्त्यांपैकी एकाने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला. आयुक्तांच्या दालनात हा प्रकार घडल्यामुळे अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मनपाची अनेक कामे राजकीय दबावातून रखडलेली आहे. राजकीय वादात अधिकारी भरडले जात असून, राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या काही ठराविक ठेकेदार व अधिकार्‍यांमुळे संपूर्ण प्रशासनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या