सुजय विखे राजकीय ऑपरेशन व्यवस्थित करणार : पंकजा मुंडेनगर : 
विधानसभा व लोकसभा या सभागृहांमध्ये कायदे बनविले जातात. आत जिथे कायदे बनवितात, त्या सभागृहात कायदे मोडणारे पाठविणार का? असा सवाल करत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी उमेदवारावर निषाणा साधला आहे. डॉ. सुजय विखेंना ऑपरेशन करता येत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, हे राजकीय ऑपरेशनही ते व्यवस्थित करतील, असे सांगत तुम्हाला साधी दाढी सुध्दा करता येत नाही, असा खरमरीत टोला पंकजिा मुंडे यांनी लगावला आहे. खा.प्रितम मुंडे यांच्यापेक्षाही अधिक मताधिक्क्य डॉ.सुजय विखेंना द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे आयोजित सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी आ.मोनिका राजळे, डॉ. सुजय विखे, अरुण मुंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ना. पंकजा मुंडे म्हणाल्या की, कॉंग्रेसने दोन धर्मांत तेढ निर्माण केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जातीच्या नावाने माणसांना विभागण्याचे काम केले आहे. मात्र, पगडीवाल्या मुख्यमंत्र्यानेच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारला सकारात्मक अहवालही त्यांच्याच सरकारने दिला आहे. दुसर्‍यांची घरे फोडायची आणि स्वतः घर तसेच ठेवायचे, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. रामायण महाभारतापासून रक्ताच्या नात्याने धोका दिल्याची उदाहरणे आहेत. मात्र, रक्ताच नाही तर कर्माचं नातं महत्वाचं आहे. लोकशाहीच्या या यज्ञात फक्त विकासाचे नाते व देशभक्तीची जात पाहून विकासाचे, देशाचे संरक्षण करणार्‍या व्यक्तीमागे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. बाळासाहेब विखे यांच्या समाजसेवेचा व मैत्रीचा तीन पिढ्यांचा वारसा डॉ. सुजय विखे पाटील यांना लाभला आहे. या निवडणुकीत डॉ. सुजय विखे हे विजयी होणारच आहेत. मात्र, हा वारसा चालविणे ही तारेवरची कसरत असून डॉ. विखे यांना ती जबाबदारीने पार पाडावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. खा. प्रीतम मुंडे यांना लोकसभेत एक भाऊ पाहिजे. त्यासाठी  डॉ.सुजय विखे यांना त्यांच्यापेक्षाही जास्त मताधिक्याने विजयी करा व विरोधकांनी पसरविलेल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, विरोधक स्व. राजीव राजळे यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणार्‍या पोस्ट सोशल मीडीयात व्हायरल करत आहेत. त्याची दखल घेऊ नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या