अबब... पार्थ पवारांकडे आहे इतकी संपत्ती!


पुणे : 
केंद्रीय कृषिमंत्री पदावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कुटुंबाला शेतीतून काेट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्या निवडणूक आयाेगाला सादर करण्यात आलेल्या मालमत्तेच्या तपशिलावरून स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती तसेच कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, पवार कुटुंबीयांनी अशाही स्थितीत शेतीतून काेट्यवधींचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी ही कला शिकण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, पार्थ पवारने सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्याच्याकडे २० काेटींची मालमत्ता असून त्याने आजाेबा शरद पवार यांना ५० लाख रुपये शेअरपाेटी, तर आत्या खासदार सुप्रिया सुळे यांना ३० लाख रुपये शेअरपाेटी आगाऊ रक्कम दिली आहे.

मावळ लाेकसभा निवडणुकीतून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पार्थकडे १६ काेटी ४२ लाख ८५ हजार रुपये किमतीची स्थावर, तर ३ काेटी ६९ लाख ५४ हजार रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. शेती आणि इतर व्यवसाय हे आपले प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याचे त्याने सांगितले आहे. बारामती तालुक्यात साेनगाव व ढेकळवाडी आणि मुळशी तालुक्यात घाेटावडे येथे त्यांच्या नावावर शेतजमीन असून स्थावर मालमत्तेत शेतीपेक्षा बिगर शेतजमीन असलेली मालमत्ता त्यांच्याकडे जास्त आहे, असेही त्यांनी नमूद केल्याचे शपथपत्रात दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या