पंतप्रधान मोदींची नगरमधील सभा: २०१४ आणि २०१९; फायदा होणार की तोटा?


नगर : विशेष प्रतिनिधी
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे व शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगरमध्ये सभा घेतली. २०१४ सालीही मोदींनी प्रचारसभा घेतली होती. या दोन्ही सभांमध्ये असलेला जमीन-आसमानच्या संबंधामुळे यावेळेसची सभा वेगळी ठरली. या सभेचा दोन्ही उमेदवारांना फायदा होणार की तोटा हे पाहणे महत्वाचे आहे.

२०१४ साली नगरला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देशभरात मोठी लाट असल्याने नगरमधील सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. २०१४ साली निरंकारी भवनच्या याच मैदानावर झालेल्या सभेनंतर नगर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन तास लागले होते. सभेच्या ठिकाणी मंडप नसतांनाही लोकं भरउन्हात मोदींना ऐकण्यासाठी आले होते. नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिरा सभा सुरु होऊनही श्रोत्यांचा प्रतिसाद कमी झाला नव्हता. मोदींचे त्यावेळी व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचे भाषण संपून मोदी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसून निघाले तरीही त्यांना ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनी मैदान सोडले नव्हते. २०१४ साली मोदींनी सभेमधून देशातील दहशतवाद, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आदी विषयांवर बोलून मतदारांची मने जिंकली होती. त्यावेळी मोदींकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या.

आता नुकत्याच झालेल्या २०१९ मधील सभेबाबत मुद्दे पाहुयात. २०१४ ला ज्या मैदानावर सभा झाली त्याच मैदानावर यावेळी सभा घेण्यात आली. सभेसाठी गाड्या भरून लोकांना आणण्यात आले होते. सभेसाठीच्या मैदानाची जागा यावेळी बऱ्यापैकी कमी झाली आहे. या मैदानाच्या आसपास घरांची बांधकामे झाल्याने जागा तशी कमीच होती. सभेत लोकांना बसण्यासाठी मंडप आणि ५० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मंडप पूर्णपणे भरला होता. मंडपाच्या बाहेर १० हजारांच्या आसपास लोकं असतील असा अंदाज आहे. फारफार तर सभेस ६५ हजारांचा जनसमुदाय असेल. यावेळी नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने सभा सुरु झाली. मोदींच्या आधी अनेकांची भाषणे झाली.

मोदी सभास्थानी आल्यानंतर प्रथमतः शिवरायांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मोदी बोलण्यास उभे राहिल्यानंतर नागरिकांना स्थानिक प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी पाकिस्तान, राहुल गांधी, शरद पवार, सर्जिकल स्ट्राईक या विषयांवरच सभा सुरु ठेवली. जिल्ह्यात, राज्यात दुष्काळी परिस्थिती असतांना त्याबद्दल मोदींनी अवाक्षरही काढले नाही. मोदींचे भाषण सुरु होऊन दहा मिनिटे झाल्यानंतरही स्थानिक प्रश्न भाषणात न आल्याने उपस्थितांपैकी अनेकांनी सभेतून उठून जाण्यास प्राधान्य दिले. एकीकडे मोदी बोलत असतांना दुसरीकडे लोकं सभा सोडून जात होते. संपूर्ण सभेत मोदींनी भाजपचे उमेदवार सुजय विखे व शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे साधे नावही घेतले नाही.

त्यातही मोदींना येण्यापूर्वी खा. दिलीप गांधी यांना भाषण अर्धवट सोडून थांबण्यास सांगण्यात आले. विद्यमान खासदारांचा भरसभेत अवमान झाल्याने अनेकांना ही बाब चांगलीच खटकली. त्यामुळे मोदींची सभा ही सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांना फायदेशीर ठरेल असे वाटत नाही. मोदींची सभा यावेळेस भाजप, शिवसेनेला फायदेशीर ठरण्यापेक्षा तोट्याचीच ठरण्याची शक्यता जास्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या