भ्रष्टाचार, कामातील टक्केवारी, राष्ट्रवादीशी युती, जनतेच्या नाराजीमुळेच खा. गांधींचे तिकीट कापले


नगर :
पक्षश्रेष्ठींनी खासदार दिलीप गांधी यांचे लोकसभेचे तिकीट कापल्याने त्यांनी विविध माध्यमातून भाजपवर अप्रत्यक्ष टीका करून अकांडतांडव सुरू केला असल्याचा आरोप करीत, त्यांना तिकीट नाकारण्याचे कारण अर्बन बँकेतील भ्रष्टाचार, कामामधील टक्केवारी, राष्ट्रवादीशी युती करुन पक्षश्रेष्ठींची ओढवलेली नाराजी, जनतेत असलेली त्यांच्याप्रती नाराजी हे असल्याचे भाजपचे मा.जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.अच्युत पिंगळे यांनी खुलासा केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत जनतेची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल होऊन भाजपचा उमेदवार पराभूत व्हावा अशी गांधी यांची व्यूहरचना आहे. परंतु गांधी यांना टिकीट का दिले नाही? याची वस्तुस्थिती प्रत्यक्षात वेगळी आहे. हे जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड.पिंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे. गांधी यांनी तिकीट नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन चुकीचे स्पष्टीकरण दिले. नगर अर्बन बँकेतील गैरकारभार बाबत ऑडिटरने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पुराव्यासहित फाईल्स आणि तेथील भ्रष्टाचाराचे पुरावे पक्षश्रेष्ठींकडे गेले आहेत. बिहाणी यांनी गांधी यांच्याविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बिहाणी यांनी न्यायालयात सर्व पुरावे सादर केले. यावरुन उच्च न्यायालयाने खासदार गांधी व त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सीआयडी मार्फत तपास करण्याचे आदेश दिले. या प्रकरणांची पूर्णत: शहानिशा करून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला आहे. गांधी यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वतःच्या अतिक्रमणाचा विषय काढला होता. लोकांना माझ्या बंगल्याचे अतिक्रमण दिसते इतरांचे दिसत नसल्याचे स्पष्टीकरण खा.गांधी यांनी दिले. यावरून त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले असल्याचे कबूल केले आहे. यावेळी गांधी यांना लोकसभेचे तिकीट देऊ नये त्यांना तिकीट दिल्यास त्यांचा पराभव होईल असे वातावरण नगर दक्षिण मतदारसंघांमध्ये निर्माण झाले असल्याने त्यांना तिकीट नाकारल्याचे अ‍ॅड.पिंगळे यांनी स्पष्ट केले आहे.

तंबाखू प्रकरणाने गांधी यांची देशभर नाचक्की झाली. नगर अर्बन बँकेतील प्रचंड भ्रष्टाचार, उड्डाणपूल, विमानतळ, औद्योगिक क्षेत्रात 15 वर्षात त्यांनी केलेले शुन्य काम, खासदार निधी व इतर सरकारी कामातील टक्केवारी, जनतेची फसवणुक या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या तोंडी झाल्या होत्या. यामुळे खा.गांधी विरोधात दक्षिण मतदार संघात मोठी लाट असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले होते. त्यांच्याविरोधात असलेली जनमताची लाट महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आली. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे सर्व अधिकार त्यांच्याकडे होते. मात्र त्यांनी जनतेच्या मनात तिरस्कार असणार्‍यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन, त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिली. व्यक्ती द्वेषातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत छुपी युती करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली. 42 नगरसेवक निवडून आनण्याचे वचन देऊन पक्षाची एक प्रकारे त्यांनी फसवणुक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

15 वर्ष खासदार, नगर शहर भाजपचे अध्यक्ष, नगर अर्बन बँकेचे चेअरमन, भाजपची निवडणूक यंत्रणा हाताशी असताना महापालिकेत मुलगा, सुन व  आग्रहाने तिकीट दिलेल्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. यावरुन त्यांच्याप्रती असलेली जनमताची लाट दिसून आली. त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वीच झाला होता. नवीन उमेदवारांचा शोध सुरू होता पालकमंत्री राम शिंदे, श्याम जाजू, भानुदास बेरड यांचा विचार सुरू होता. महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना तसे संदेश मुंबई आणि दिल्ली कडून दिले गेले होते. परंतु सर्व पक्षांतर्गत मामला असल्यामुळे त्याची चर्चा खरे कार्यकर्ते करीत नव्हते. गांधी यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी अकांडतांडव सुरू केला. पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केला, मी जनसंघापासून कार्यकर्ता आहे. हे सर्व खरे असले तरी त्यांना तिकीट नाकारण्याचे कारण वेगळे आहे. मी जैन समाजाचा असल्यामुळे माझ्यावर अन्याय करण्यात आला. हा समाजाचा अपमान आहे. हा त्यांचा आरोप चुकीचा असून, आजही जैन समाज मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. गांधी यांना पडणारी 80 टक्के मते ही इतर समाजाची म्हणजेच भाजपची आहेत. जैन व मारवाडी यांच्याबद्दल गांधी यांना खरे प्रेम असते तर समाजाच्या विकासासाठी असलेल्या नगर अर्बन बँकेत भ्रष्टाचार करुन बँकेला त्यांनी रसातळास नेले नसते. जैन समाजाच्या एका संस्थेकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेऊन गांधी यांनी त्या संस्थेला अडचणीत आनले आहे. सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा हे त्यांच्या समाजाचे असून, नगर अर्बन बँकेत गांधी यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराची त्यांनी सडकून टीका केली. तसेच गोरगरिबांच्या रुग्णसेवेसाठी आधार ठरलेल्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या विरोधात शासन दरबारी पत्रव्यवहार करण्याचे पाप कोणी केले? हे समाजात सर्वश्रुत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात अ‍ॅड.पिंगळे यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या