कुकडीचे पाणी देता येत नाही तर राजीनामा द्या : आ. जगतापांकडून राम शिंदेंचा समाचार


कर्जत : 

राज्याची सत्ता ही सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. मात्र पालकमंत्र्यांना हेच कळत नाही. ते घोषणा करतात, कुकडीचे पाणी पाच वाजता सोडू. पण पाच पहाटेचे की सायंकाळचे हे मात्र ते सांगत नाहीत. खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत आहेत. सत्ता असूनही पाणी देता येत नसेल तर त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान आ. संग्राम जगताप यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना दिले.

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आ. जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी मुबारक मोगल होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मधूकर घालमे, सुरेश जगताप, मनसेचे सचिन पोटरे, राजेंद्र गुंड, बाळासाहेब गुंड, किरण पाटील, काकासाहेब तापकीर, काका गुंड, काकासाहेब साळूंके, गुलाबकाका तनपुरै, प्रविण घुले, उमेश परहर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. जगताप म्हणाले, की सत्ता ताब्यात असूनही सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देता येत नसेल तर ती सत्ता काय कामाची? ही निवडणूक उद्याच्या काळात निर्माण हाणारे प्रश्न सोडवण्याची निर्णायक लढाई आहे. आज जर निर्णय चुकला तर आपल्या सर्वांना पाच वर्षे पश्चात्ताप करावा लागेल. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करुन सेवेची संधी द्या. बाकीचे लोक या निवडणुकीचा निकाल लागताच गायब होतील. मात्र आगामी काळातील अनेक वर्षे तुम्हाला सहजासहजी भेटणारा 'दक्षिणेचा संग्राम' आहे.


गनिमीकाव्याचे धोरण हाती घ्याआतापर्यंतच्या इतिहासात उत्तरेच्या बलाढ्य शत्रूंना दक्षिणेवर केलेले आक्रमण परतावून लावण्याचे शौर्य दाखविलेले आहे. यासाठी शिवरायांच्या गनिमीकाव्याचा वापर केला गेला. या निवडणुकीतही दक्षिणेचे सूज्ञ मतदार गनिमीकाव्याचे धोरण हाती घेऊन उत्तरेचे आक्रमण सहजासहजी परतावून लावतील, असा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या