शिवाजीराव गाडेंचे कार्य सदैव स्मरणात राहील : आ. संग्राम जगताप


नगर :

स्व. शिवाजीराव गाडे यांनी स्वःकर्तुत्वावर राहुरी तालुक्यात स्वतंत्र स्थान निर्माण केले. सहकार क्षेत्रातील ते अभ्यासू व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. गाडे यांच्या निधनामुळे शेतकरी व सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व हरपले आहे. त्यांचे कार्य हे सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत आ.संग्राम जगताप यांनी शिवाजीराव गाडे यांना श्रध्दांजली वाहिली.

राहुरी तालुक्यातील जि. प. सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव गाडे यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी मंगळवारी (दि.२) पहाटे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजातच राहुरी तालुक्यावर शोककळा पसरली. बारागाव नांदूर येथे शिवाजीराजे गाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला. नगर येथील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभेतही गाडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

आ.जगताप म्हणाले की, सोमवारी दिवसभर मी त्यांच्या समवेत राहुरी तालुक्यात फिरलो. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी मला मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक, शेतकर्‍यांशी त्यांचे असलेले नाते, शेतकर्‍यांचा त्यांच्यावरील विश्‍वास, सर्वांना सोबत घेऊन सर्वसामान्य  गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व त्यातून लोकांमध्ये त्यांच्या प्रती निर्माण झालेला विश्‍वास संपूर्ण दौर्‍यात अनुभवायला मिळाला. त्यांचे कार्य व राहुरी तालुक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या