साकळाई योजनेबाबत त्यांचा अभ्यास कमी : आ.संग्राम जगताप यांचे टीकास्त्रनगर :
श्रीगोंदा तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या १२८ कोटी  रुपये खर्चाच्या  साकळाई पाणी योजन अंतिम टप्यात असून  फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी आहे.  मुळातच ते स्थानिक नसल्याने त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाहीये. त्यातच  त्यांचा अभ्यास कमी असल्याने  ते या योजनेचा सर्व्हे करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्याचा अडाणीपणा करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी – कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी डॉ. विखेंचा नामोल्लेख टाळून केली.

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील सभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, आ. राहूल जगताप, कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, अविनाश घुले, जिजा नाना खामकर, अण्णासाहेब थिटे, संगिता खामकर, शरद जगताप आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी आ. जगताप यांचे  तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भर उन्हात स्वागत करून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली. श्रीगोंदा येथील आठवडे बाजारात आ. जगताप यांनी मतदारांच्या व विविध वस्तू विक्रेत्यांच्या  गाठीभेटी घेतल्या. एका भाजी विक्रेत्या आजीने आ. जगताप यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला.  तत्पूर्वी कोळगाव येथील कोळाईदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होणाऱ्या धज (ध्वज) पायी दिंडीत  आ. संग्राम जगताप सहभागी होवून दिंडीतील पवित्र  धज डोक्यावर घेऊन भाविकांसमवेत पायी चालले. गावातील रूढी परंपरे नुसार  दिंडी समोर झोपून आ.संग्राम जगताप यांच्या अंगावरून धज नेण्यात आला. दरम्यान, श्रीगोंदा येथील दिवाणी न्यायालय परिसरात असलेल्या वकिलांच्या  चेंबर्समध्ये जाऊन वकील मंडळींशी आ.जगताप यांनी  संवाद साधला.

आ. जगताप पुढे म्हणाले, १९९७-९८ पासून प्रलंबित असलेल्या साकळाई पाणी योजनेवर आतापर्यंत राजकारण करण्यात आले. राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या वतीने या महत्वाच्या प्रकल्पासाठी निधी मिळल्यासाठी वारंवार आंदोलने केली, त्यामुळे आता या योजनेसाठी १२८ कोटींचा खर्च अपेक्षित असून या योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीसाठी आहे. मुख्यमंत्र्यांची केवळ सहीच राहिली असताना विरोधी उमेदवार या योजनेचा सर्व्हे करण्याची मागणी करीत आहेत. याचा अर्थ त्यांना स्थानिक प्रश्नांची अजिबात माहिती नाही. त्यांना सत्ता व पदे  केवळ स्वत:च्या संस्था वाढविण्यासाठी हवी आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणेघेणी नाही. २३ एप्रिलनंतर कदाचित ते दक्षिणेत फिरकणारही नाही. मी मात्र २४ तास जनतेला भेटणारा तुमच्या हक्काचा दक्षिणेचा संग्राम आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने संधी द्या.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष भोस, घनश्याम शेलार आ. राहूल जगताप यांनीही भाषणातून विरोधी उमेदवारावर तोफ डागली.

भोस म्हणाले, आपल्या सर्वांच्या आत्मसन्मानाची आणि महत्त्वाच्या प्रश्नांची ही निवडणूक आहे. गेल्या साडेचार वर्षांत या सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळे  शेतकऱ्यांसह सर्वच समाज घटकातील जनतेला प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हा त्रास आठवून हे सरकार उलथवून लावा व केंद्रात शेतकऱ्यांच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी संग्राम जगताप सारख्या विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवाराला खासदार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे.

घनश्याम शेलार म्हणाले, हे सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधी असून या सरकारने शेतकरी पूर्णतः नागविला आहे. शेतमालाला हमीभाव न देणे, दूधदरात वाढ न देणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या सरकारला घरी बसविण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या