'ज्यांनी नगरचे विमानतळ पळवून नेले, ते काय नगरचा विकास करणार? : आ. संग्राम जगताप यांचा सवाल



नगर-
विकासाच्या केवळ वल्गना करायच्या, ब्ल्लू प्रिंट दाखवून जनतेला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जायचे काम ज्यांनी केले, त्या खोटारड्या लोकांनी खा. दिलीप गांधींवर दबाव आणून नगरचे हक्काचे विमानतळ पळवून नेले. ते काय या दक्षिण मतदारसंघाचा विकास करणार. नगर तालुक्यात विमानतळ झाले असते तर मोठा विकास तालुक्याचा झाला असता. त्यांनी  विमानतळ उत्तरेत पळवले मात्र स्वतःचे  हेलिकॉप्टर उतरवण्य साठी जोगोजागी हेलिपॅड केले, असा टोला राष्ट्रावादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार  आ. संग्राम जगताप यांनी मारला. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बायजाबाई जेऊर येथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी प्रा.रघुनाथ झिने, किसनराव लोटके, सबाजीराव गायकवाड, उध्दवराव दुसूंगे, दादासाहेब दरेकर, जाकिर शेख, गणेश आवारे, काळूराम काळे, विलासराव आल्हाट, संतोष पवार आदींसह इमामपूर, बहिरवाडी, खोसपुरी आदी ठिकाणचे हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी आ. संग्राम जगताप यांनी ग्रामदैवत बायजामातेचे दर्शन घेतले. त्यानंतर जेऊरच्या आठवडी बाजारात विविध भागातून आलेल्या भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या आ. जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला युवकांनी आ. जगताप यांना नववर्षाचे प्रतिक असलेल्या गुढीची प्रतिक्रुती भेट देऊन सत्कार केला.

यावेळी दादासाहेब दरेकर, किसनराव लोटके, उध्दवराव दुसूंगे, सबाजीराव गायकवाड, विलासराव आल्हाट आदींची भाषणे झाली. या गावातील ग्रामस्थांच्या पाणी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सत्तेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचे अनेकांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्तर देतांना आ. जगताप म्हणाले, मी जरी विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व करत असलो तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवल्याने मला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. विरोधीपक्ष नेते कितीवेळा निलंबित झाले ते त्यांनी सांगावे. मी वास्तव्याने जरी शहरी असलो तरी ग्रामीण भागशी माझी नाळ जुळली आहे. बाकीचे लोक येतील, गोड गोड बोलतील, मोठी स्वप्ने दाखवतील आणि  २३ मार्च नंतर गायब होतील. पण मी कायमस्वरुपी तुम्हाला भेटणारा, तुमच्या हक्काचा दक्षिणेचा संग्राम आहे. शेतमालला हमीभाव मिळवून देण्यासाठी आपण वेळप्रसंगी सत्ता पणाला लावू.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आ. जगताप यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या