शेवटी आई ती आईच... पक्षनिष्ठा सोडून मुलगा सुजयच्या प्रचारात शालिनीताई सक्रियशेवगाव : तालुका प्रतिनिधी 
मुलगा सुजय याने भाजपात प्रवेश केल्यानंतरही पक्षनिष्ठेमुळे प्रचारात न गेलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी अखेर पक्षनिष्ठा बाजूला सारत मुलासाठी मताचे दान मागण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे भाजपाकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवित असून, आता काँग्रेसच्या जि.प अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे ह्या भाजपाच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

शेवगाव तालुक्यात विविध गावांमध्ये काँग्रेसच्या जि.प अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे यांनी भाजपा उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बैठका घेत नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. कांचन मांढरे व काँग्रेसच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

शेवगाव तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभा घेतली तर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ थेट काँग्रेसच्या जि.प अध्यक्षाच मैदानात उतरल्या. सौ.शालिनी विखे यांनी भाजपासाठी मते मागितली. यावेळी नागरिकांचा गोंधळ उडाला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर मतदारसंघात भाजपच्या प्रचारात काँग्रेसचे विखे कुटूंब सक्रिय झाले आहे. राधाकृष्ण विखे हेही भाजपा उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. आज सौ. शालिनी विखे प्रचारात दाखल झाल्याने राधाकृष्ण विखे व संपूर्ण विखे कुटुंब भाजपात लवकरच दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.

पक्षनिष्ठा सोडत अखेर शालिनीताई भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने 'आई ती आईच' या वाक्याचा प्रत्यय आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या