बोल्हेगाव रस्त्याचे काम आ. जगतापांनीच बंद पाडले : शिवसेनेचा आरोप

IMG_20190427_152751

नगर : प्रतिनिधीमहापालिकेत आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात अधिकारी-ठेकेदार काम करत नसल्याने काम करावे, म्हणून नागरीक आंदोलन करत होते. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या दबावामुळेच बोल्हेगाव रस्त्याचे काम बंद पडले आहे. त्यांच्या दबावामुळेच अधिकार्‍यांनीही फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला, असा आरोपही शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला आहे.


बोल्हेगाव कमान ते गणेश चौक रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. या संदर्भात शिवसेनेने यापूर्वीही आंदोलने केली होती. शुक्रवारी (दि.26) पुन्हा शिवसेनेने केलेल्या आंदोलनादरम्यान शहर अभियंत्यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह नगरसेवक, पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात शहरप्रमुख सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही निषाणा साधला आहे.
दिलीप सातपुते म्हणाले की, बोल्हेगाव रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट अवस्थेत सोडले आहे. रस्ता खोदून ठेवला आहे. खडी टाकली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून रस्त्याची ही अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार काम का करत नाही, मनपा प्रशासन त्याच्यावर कारवाई का करत नाही? याचा जाब विचारण्यासाठी तेथील नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांच्या दालनात आंदोलन केले. शहर अभियंत्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. दरम्यानच्या काळात शिवसेना उपनेते अनिल राठोड हेही तिथे आले होते. दालनात घडलेल्या प्रकाराबाबत सरकारी कामाचा अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात एखादे काम सुरू असतांना शासकीय कर्मचारी एखादे काम करत असतांना त्याला अडवून काम बंद पाडले तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो, असा दावा करत आंदोलनकर्ते काम सुरू करण्याची मागणी करत होते, त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला आहे. सदरचा गुन्हा हा खोटा असून त्यात उपस्थित सर्वांनाच आरोपी करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तिथे उपस्थित होते. त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. जे काम करत नाहीत, ते काम करा म्हणून मागणी करणार्‍यांवर कामात अडथळे आणल्याचे खोटे गुन्हे दाखल करत आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, सदर रस्त्याचे काम आ.संग्राम जगताप यांनी ठेकेदारावर दबाव आणून बंद पाडलेले आहे. त्यांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव टाकला, असा आरोपही सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागेपर्यंत शिवसेना पाठपुरावा करणार असून, तात्काळ काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या घर किंवा कार्यालयासमोर आता आंदोलन करणार असल्याचा इशारा सातपुते यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेस माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, योगीराज गाडे, राम नळकांडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या