शहर स्थापना दिनानिमित्त 'होशवालोंको खबर क्या' मैफिलअहमदनगर - ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्यावतीने रविवार दि. २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भिस्तबाग महाल, तपोवन रोड, सावेडी अहमदनगर येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रतिभाशाली गझल गायक आल्हाद काशीकर यांच्या 'होशवालोंको खबर क्या'. या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी दिली अाहे.

हस्त बेहस्त बाग महाल (भिस्तबाग महाल) ही वास्तू अहमदनगर शहराचा ५२९ वर्षांची साक्षीदार अाहे. या वास्तूच्या सानिध्यात आकर्षक विविधरंगी प्रकाशाच्या रोषणाईने उजळणारी गझल मैफल रसिक नगरकरांसाठी आनंदाची अनुभूती देणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे, पोलिस उपधीक्षक संदीप मिटके, उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, प्रदिप गांधी, डॉ. रविंद्र साताळकर, पेमराज बोथरा, सुभाष कायगावकर, संतोष झावरे, कारीम हुंडेकरी, एस. पी. कुलकर्णी, यावेळी उपस्थित राहणार आहेत.

गझल गायक आल्हाद काशीकर यांनी जानीसर अख्तर, पद्मश्री निदा फाजली, बशिर बद्राजी आदी शायरांनी लिहिलेल्या गझल गायिल्या आहेत. गेल्या दशकापासून आल्हाद आणि स्वाती काशीकर हे गझल गायन क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, दुबई, अबुधाबीसह परदेशात विविध ठिकाणी गझल गायन केले आहे. नगरला होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रसिद्ध गझल गायक जगजित सिंह, मेहंदी हसन व इतर नामांकित गझल सम्राटांच्या गाजलेल्या गझल सादर करणार आहेत.

पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराच्या स्थापनेला ५२९ वर्ष पूर्ण होत आहेत. 'रसिक ग्रुप' शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहराचा प्रेरणदायी इतिहास नगरकर, पर्यटकांसमोर मांडला आहे. शहराचा वर्धापन दिन साजरा करण्याची मुहूर्तमेढ रसिक ग्रुपने रोवली. शहराला धार्मिक एकात्मतेची आणि क्रांतिकारी लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

शहराच्या स्थापना दिनानिमित्त टिपूर चांदण्यात होणारी ही आल्हाददायी गझल मैफल अनुभवण्यासाठी समस्त नगरकर रसिकांनी या विनामूल्य कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रसिक ग्रुपच्या वतीने सुदर्शन कुलकर्णी, बाळासाहेब नरसाळे, तुषार बुगे, दिपाली देऊतकर, शारदा होशिंग, स्नेहल उपाध्ये, श्रीकृष्ण बारटक्के, निखिल डफळ, प्रसन्न येखे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या