लोकसभा निवडणूक : नगर पाठोपाठ शिर्डीची लढतही झाली प्रतिष्ठेची

18_1552542947

नगर : प्रतिनिधी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली असली, या मतदारसंघातील निवडणुकीवरुन निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आता जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उघडपणे शिवसेनेच्या उमेदवाराला साथ देत संपूर्ण यंत्रणा खा.सदाशिव लोखंडे यांच्या पाठिशी उभी केली. दुसरीकडे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विखेंचे आव्हान थोपवून शिर्डीची जागा निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि शिवसेना उमेदवारांऐवजी विखे-थोरात यांच्यातच ही लढत प्रतिष्ठेची झाल्याचे चित्र आहे.


शिर्डी लोकसभेसाठी शनिवारी (दि.२७) जाहीर प्रचार बंद झाला. उद्या (सोमवारी) या जागेसाठी मतदान होणार आहे. कॉंग्रेस व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नितीन गडकरी यांच्या या मतदारसंघात सभा झाल्या आहेत. श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत असली तरी भाजपचे बंडखोर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मैदानात उडी घेऊन रंगत आणली आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील लढतीमुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीनंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर थेट निषाणा साधत राधाकृष्ण विखे यांनी उघडपणे शिवसेनेला साथ दिल्यामुळे शिर्डीची लढत लक्षवेधी ठरणार आहे. विखे-थोरात यांच्यात ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे. दरम्यान, नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्यातील नवीन राजकीय समीकरणांची जुळणी होणार असल्याने या दोन्ही निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या