राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची तक्रार, गृहमंत्रालयाची नोटीस

Rahul-Gandhi


वेब न्यूज 

राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाचं प्रकरण तापलं आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. "तुमच्या ब्रिटिश नागरिकत्त्वाबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून यावर तुमची भूमिका स्पष्ट करा आणि पुरावे सादर करा," असे निर्देश राहुल गांधींना या नोटीसमधून देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने 15 दिवसांमध्ये राहुल गांधींना उत्तर देण्यास सांगितलं आहे.


भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्रालयाने राहुल गांधींना ही नोटीस पाठवली आहे. नागरिकत्त्व विभागाचे संचालक बीसी जोशी यांनी राहुल गांधींच्या नवी दिल्लीतील 12 तुघलक रोडवरील निवासस्थानी ही नोटीस पाठवली आहे. "एका कंपनीच्या दस्तऐवजांमध्ये तुमचं नागरिकत्त्व ब्रिटिश असल्याची नोंद आहे, यावर तुम्ही योग्य पुरावे सादर करा," असे निर्देश 29 एप्रिल रोजी पाठवलेल्या या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. "खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आणलं आहे की, 2003 मध्ये यूकेमध्ये नोंदणी असलेल्या Backops Limited नावाच्या कंपनीत राहुल गांधी संचालक आणि सचिवही आहेत. तसंच 2005 आणि 2006 मध्ये कंपनीने फाईल केलेल्या वार्षिक रिटर्नमध्ये तुमची जन्मतारीख 19/06/1970 सांगण्यात आली आहे आणि तुमचं नागरिकत्त्व ब्रिटिश असल्याचं घोषित केलं आहे," असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिकत्त्व घेत असून त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी अमेठी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांनी काही दिवसांपूर्वी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज तपासून वैध असल्याचं सांगितलं होतं. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच यूपीतील अमेठी आणि केरळच्या वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाविरोधात सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दोन वेळा गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. 21 सप्टेंबर 2017 रोजी स्वामीने याबाबत तक्रार केली होती. मग स्वामी यांनी 29 एप्रिल 2019 रोजीही पत्र लिहून राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप केला आहे. तर काँग्रेसने सुब्रह्मण्यम स्वामी यांचे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "राहुल गांधी जन्माने भारतीय आहे आणि भाजप खासदार स्वामी यांचे दावे काँग्रेस पक्ष फेटाळत आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या