गडचिरोलीत नक्षल्यांचा उच्छाद; भूसुरुंग स्फोटात १६ जवान शहीद


गडचिरोली : 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर नक्षल्यांनी उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 16 जवान शहीद झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, गडचिरोलीच्या सी60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचप्रमाणे नक्षलींच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेधही केला आहे.

नक्षलींना चकवण्यासाठी 16 जवान दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या